मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी – मुख्यमंत्री शिंदे

50

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

दरम्यान, मेटे यांच्या निधनामुळं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.