मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या महा रोड शो

0
295

मुख्यमंत्र्यांचा उद्या महा रोड शो, बारणे करणार शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या ‘महा रोड शो’ने होणार बारणे यांच्या प्रचाराची सांगता

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची सांगता होईल.

बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा मावळ मतदारसंघात येत असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

चिंचवड येथील चापेकर चौकातून सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ होईल. चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम एम स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर 16 नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग असणार आहे. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ महा रोड शोची सांगता होईल.

या महा रोड शोमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर महायुतीचे काही वरिष्ठ नेते देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या महा रोड शोमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी केले आहे.