मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपत्रातेचा लवकरच निर्णय, अजितदादा होणार मुख्यमंत्री

0
423

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्याच्या आत यासंदर्भात अहवाल सादर करा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा विषय लांबणीवर टाकत राहण्याची भाजप आणि शिंदे गटाची चाल अपयशी ठरली आहे. परिणामी आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल देणे अपरिहार्य असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आणि दहाव्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसू शकतो. खरंच अशी परिस्थिती उद्धवल्यास अकारण राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये, यासाठी भाजपच्या गोटात रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून हा भाजप पुढचा पहिला पर्याय असेल. याशिवाय भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपकडून आपले पुढील पत्ते उघड केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागल्यास भाजप त्यांचे कशाप्रकारे पुनर्वनस करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच ते आगामी काळात मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. अजितदादांच्या गटाचे आमदार मध्यंतरीच्या काळात उघड उघड यासंदर्भात बोलत होते. यावरुन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार नाराज झाले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत आगामी काळात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही हे पद दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यास देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.