मी असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही – अजित पवार

0
186

मुंबई , दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यादमरम्यान अजित पवार गटात गेलेले नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत फोटो शेअर केला होता. यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता मला त्याबद्दल काही बोलायचं नाही असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. याचा फोटो त्याचा फोटो ते माझं काम नाही. तु्म्ही विकासाबद्दल मला विचारा. विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि आमचं काम सुरू आहे. मी सातत्याने महाराष्ट्रात फिरताना प्रश्न सोडवण्यासाठी मी बैठका आणि आढावा घेतोय त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे असे अजित पवार म्हणाले.

सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याबद्दल अजित पवार यांना विचारण्यात आले असता, मी असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही असं रोखठोक उत्तर अजित पवारांनी दिलं.
प्रफुल्ल पटेल यांनी फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. “नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणं उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीनच खास बनला आहे. त्याचबरोबर कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा आहे” असे पटेल म्हणाले होते. दरम्यान या फोटोनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.