मित्राचा खून करून पळालेल्या आरोपीला कल्याण मधून अटक

0
2006

रावेत, दि. १५ (पीसीबी) – मित्राचा खून करून पळालेल्या आरोपीला रावेत पोलिसांनी कल्याण येथून अटक केली. चार सप्टेंबर रोजी रावेत येथील एका बांधकाम साइटवर ही घटना घडली होती.

विवेक गणेश पासवान (वय 24, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. दिनेश रामविलास यादव (वय 21, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवकुमार घनश्याम प्रजापती (वय 19, रा. मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुंबई-पुणे महामार्गालग किवळे येथे रुणाल गेटवे सोसायटीजवळ निर्माण माईल स्टोन ही बांधकाम साईट आहे. या साईटवर मयत विवेक पासवान, संशयित दिनेश यादव आणि फिर्यादी शिवकुमार प्रजापती यांच्यासह अन्य काही जण फरशी बसविण्याचे काम करतात. त्यातील मयत विवेक हा इतर पाच जणांसह साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहण्यास होता. त्याचा आणि त्याच्यासोबतच्या इतर मजुरांचा रविवारी पगार झाला. त्यामुळे मयत विवेक याने काही मजुरांसह पार्टी केली. त्यानंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले असता विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपानासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची विट मारली. यात गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश यादव हा तेथून पळून गेला.

रावेत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये आरोपी हा मुंबईच्या दिशेने पळून गेले असे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी कल्याण येथील शिवाजी चौकातून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आर शिकलगार, विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार कोळगे, गायकवाड, नंदलाल राऊत, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब्राह्मण, संतोष धवडे, महिला पोलीस अंमलदार धाकडे यांनी केली.