मावळ लोकसभेसाठी संदीप वाघेरेंची जोरदार तयारी

0
495

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून खासदार श्रीरंग बारणे हे हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिल्याने ते कामाला लागलेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुध्दा त्यांना भक्कम साथ आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांचे आमदारसुध्दा महायुतीच्या बाजुचे आहेत. दोन निवडणुकांचा अनुभव गाठिशी आहे. अशा परिस्थितीत बारणे यांचे प्रतिस्पर्धी कोण असणार याबाबत काही नावांवर चर्चा सुरू आहे, मात्र त्यात नक्की उमेदवार कोण असणार याबाबत एकमत नव्हते.

भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हेच असणार यावर फक्त अधिकृत शिक्कामोर्तब बाकी आहे. सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने खासदारकी जिंकलेल्या बारणे यांच्या समोर तोडिस तोड असा उमेदवार कोण असणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे. उध्दव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस यांच्या इंडिया महाआघाडीकडून तीन नावे चर्चेत होती. त्यात पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, चिंचवड विधानसभा निवडणूक लढविलेले शिवसेनेचे महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, शेकापचे पनवेलमधील माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे अशी नावे चर्चेत होती. प्रत्यक्षात वाघेरे यांनी अंगाला तेल लावले आणि आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसले. साधारणतः फेब्रुवारी अखेरीस लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होईल असे गृहित धरून त्यांनी मतदारसंघातील गाठीभेटी, दौरे, बैठकांचा सपाटा लावला आहे.

महापालिकेत अगदी पहिल्यांदाच म्हणजे २०१७ मध्ये भाजपाकडून पिंपरीगावातून संदीप वाघेरे हे नगरसेवक झाले. पाच वर्षांत त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून अनेक कामे केली. गावातील मंदिरे, उद्याने, स्मशानात स्वखर्चाने काही कामे करून दिली. आर्थिक मदत तसेच विविध माध्यमांतून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राजकारणात एक बेधडक, आक्रमक नगरसेवक अशी प्रतिमान केली. आता ते लोकसभेसाठी नशिब आजमावू पाहताहेत. या वर्षी दिवाळीनिमित्त मतदारसंघातील गावागावांत शेकडोंनी होर्डींग्ज लावून त्यांना मतदारांना शुभेच्छा दिल्या. मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, कर्जत या घाटाखालच्या तालुक्यांतून सर्व प्रमुख गावांतून तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेस, जुना मुंबई पुणे महामार्गावर वाघेरे याची होर्डींग्ज हाच सद्या चर्चेचा विषय आहे. या फलकांवर लोकसभेच्या छायाचित्रासह वाघेरे यांची छबी झळकत आहे. मात्र, कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा फलकावर वापर टाळला आहे. शिवसेना ठाकरे गट की राष्ट्रवादी शरद पवार गट याबाबत निर्णय बाकी आहे, पण इंडिया आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने वाघेरे हे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढतील अशी शक्यता आहे.

खरे तर, आगामी लोकसभा निवडणुकीची फेब्रुवारीअखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मावळमध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगडमधील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. घाटाखालचे आणि घाटावरचे अशी विभागणी आहे. मागील तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. तिन्ही वेळेस शिवसेनेने मैदान मारले. आता परिस्थिती बदलली असून शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट भाजपासोबत आहेत. हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत.

मावळ मतदारसंघ ठाकरे यांच्या गटाला सुटला आहे. त्यादृष्टीने ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. त्यात पिंपरी महापालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नावावर अंतिम निर्णय होईल. वाघेरे हे ठाकरे गटाकडूनच लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी पक्ष नेतृत्वासोबत चर्चाही केली आहे. ‘आता प्रत्येक ध्येय विकासाच गाठायचे, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचे’ असा मजकूर असलेले त्यांचे होर्डिंग्जमुळे त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते.
महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची आणि खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मावळात दोन्ही शिवसेनेतच सामना होऊ शकतो. तर, मावळात ताकद असतानाही अजित पवार गटाला महायुतीत माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.

खासदार श्रीरंग बारणे विरुध्द संदीप वाघेरे अशी दुरंगी लढत झाल्यास कोण सरस ठरणार यांचे अंदाज आडाखे आतापासून सुरू आहेत. सुमारे २५ लाख मतदार असलेल्या बलाढ्य मतदारसंघात १५ ते १६ लाख मतदान होईल. त्यात दुरंगी लढत झाली तर काय होईल, सगळेच आमदार महायुतीचे असताना महाआघाडीच्या वाघेरे यांची डाळ शिजणार का, मागच्या निवडणुकित बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केल्याने आता अजितदादा बारणेंचा प्रचार कऱणार का, फाटाफुटीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद नेमकी कुठे, किती, कशी विभागणार यावर आता कार्यकर्त्यांनी आपापल्या पध्दतीने अंदाज बांधायला सुरवात केलीय. खासदार बारणे यांच्या विरोधातील उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर किमान आता मिळाले आहे. स्वतः प्रथितयश बिल्डर, हॉटेल व्यावसायिक असलेले संदीप वाघेरे हे तितकेच ताकदिचे उमेदवार समजले जातात. शहरातील जवळपास सर्वच नातेसंबंध बारणे आणि वाघेरे यांचे समसमान आहेत. बारणे यांच्या दहा वर्षांचा लेखाजोखा आणि वाघेरे यांची नवी कोरी पाटी असा सामना आहे. बारणे आणि वाघेरे हेच उमेदवार राहिले तर, अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातीलच हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा असणार आहे.