मावळ लोकसभा मतदार सघात पोलीस यंत्रणा तयारीत

0
239

दि 3 एप्रिल (पीसीबी )- पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत,कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणेही महत्वाचे आहे,यासाठी येत्या १३ मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपले मत देऊन मतदानाच्या महत्वपुर्ण प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

३३ मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून आज निगडी येथील पोलीस मुख्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त, डाॅ.दिपक सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दलातील अधिकारी तसेच जवानांनी मतदानाची शपथ घेतली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, माधुरी कांगणे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव,मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक,नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, तहसीलदार जयराज देशमुख,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पोलीस दलातील जवान,कर्मचारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मावळ लोकसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.दिपक सिंगला यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मतदान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडता यावी यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न करावेत, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत असे मत व्यक्त करून विविध जिल्ह्य़ातून, गावांतून पिंपरी चिंचवड शहरात कामकाज करणा-या व शहराबाहेर मतदान असणा-या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी,सूत्रसंचालन व शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार पोलीस उप आयुक्त माधुरी कांगणे यांनी मानले.