मावळातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते खासदार बारणे यांच्या बरोबर – बापूसाहेब भेगडे

0
257

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी काम करतील, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव यांच्या वडगाव मावळ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक संतोष भेगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनील दाभाडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या विजयासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असे बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तालुक्यात अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्याच्या विकासासाठी अजित दादांनी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. त्याचा फायदा खासदार बारणे यांना होईल, असा विश्वास बबनराव भेगडे यांनी व्यक्त केला.

देशाच्या व राज्याच्या विकासासाठी शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख तीन पक्ष एकत्र आले आहेत. विकासाची ही घोडदौड यापुढेही जोरात सुरू राहण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे, असे खासदार बारणे म्हणाले.

मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावेळी श्रीरंग बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.