महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; घरात घुसून महिलेवर अत्याचार

0
56

पुणे, दि. 07 (पीसीबी) : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसून दररोज अशा घटना घडत आहेत. वारजे माळवाडी भागातील ५० वर्षीय नराधमाने महिलेच्या घरात घुसून अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. सलग चौथ्या दिवशी महिलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरातील एका सोसायटीत ३६ वर्षीय महिला एकटी होती. ती घरात भांडी घासत होती. घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून, आई कुठे आहे, आई कुठे आहे असा आवाज दिला. त्यावर महिलेने मला माहिती नाही, असे सांगितल्यावर आरोपीने हॉलमधील दरवाजाची कडी लावून तिच्यावर बळजबरी केली. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि थेट वारजे पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वारजे माळवाडीतच दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला त्याच्या ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि वडिलांविरुद्ध आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात गेल्या चार दिवसांत महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. आधी शाळेच्या बस चालकाने मुलींवर बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी तीन ते चार जणांच्या टोळीने मित्राबरोबर फिरायला गेलेल्या मुलीला शिकार केले. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.

दरम्यान, खराडीतील एका रेस्ट रूममध्ये ५४ वर्षीय ऑफिसबॉयने २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रूममधून बाहेर निघ असे सांगितल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादी महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.