महिला आरक्षण विधेयक हे तर राजीव गांधींची स्वप्नपूर्ती – सोनिया गांधी

0
230

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चा सुरू झाली आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यासाठी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी महिला आरक्षणाला समर्थन दिलं. त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या या मागणीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं असून त्यांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनिया गांधी यांची ही मागणी केंद्र सरकार मान्य करते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोनिया गांधी यांनी संसदेत अत्यंत कमी वेळात आपलं म्हणणं मांडलं. अगदी थोडक्यात त्यांनी महिला आरक्षणावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महिला आरक्षणाचं समर्थन करतानाच महिलांना आरक्षण देताना आरक्षणात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. महिला आरक्षणात एससी, एसटी आणि ओबीसींनाही आरक्षण दिलं पाहिजे. सरसकट आरक्षण देऊ नका, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी आरक्षणात आरक्षण देण्याची मागणी करून भाजपची कोंडी केल्याचं सांगितलं जात आहे.

15 लाख महिला निवडून आल्या
मी महिला आरक्षणाच्या विधेयकाचं समर्थन करते. या विधेयकाचं समर्थन करण्यासाठी मी इथे उभी आहे. हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांची भागीदारी निश्चित करणारं विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी लोकसभेत मांडलं होतं. त्याचाच हा परिणाम आहे. देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थात 15 लाख महिला निवडून आल्या आहेत. राजीव गांधी यांचं स्वप्न आता अर्धच पूर्ण झालं आहे. हे बिल मंजूर होताच राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. काँग्रेस या विधेयकाचं समर्थन करते, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

महिलांवर अन्याय होईल
हे विधेयक मंजूर होण्याचा आम्हाला आनंद आहे. तशीच चिंताही आहे. गेल्या 13 वर्षापासून महिला राजकीय जबाबदारी मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे. दोन वर्ष, चार वर्ष आणि सहा वर्ष किती वर्षाचा ही प्रतिक्षा असावी? हे विधेयक लगेच मंजूर करावं ही आमची मागणी आहे. मात्र, त्यापूर्वी जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. एससी एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाची या आरक्षात व्यवस्था केली जावी. सरकारने या गोष्टी केल्यानंतरच जी पावलं उचलायची ती उचलावीत. आमचं काही म्हणणं नाही. या विधेयकाला विलंब करणं म्हणजे महिलांवर अन्याय करणं होईल, असंही त्या म्हणाल्या.

निशिकांत दुबे उभे राहताच गोंधळ
सोनिया गांधी यांचं भाषण झाल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आपलं म्हणणं मांडलं. निशिकांत दुबे उभे राहताच काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. महिला खासदारांनीच सोनिया गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं, अशी मागणी यावेळी काँग्रेस खासदारांनी केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले. पुरुष महिलांच्या समस्या मांडू शकत नाही का?, असा सवाल अमित शाह यांनी केला. त्यानंतर निशिकांत दुबे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. माझी आई एम्समध्ये भरती आहे. त्यामुळे मला आपलं म्हणणं मांडण्याची आधी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दुबे यांना बोलण्याची संधी देण्यात आली.