महायुती टिकणार काय ? अजितदादांच्या आमदारानेच केला गौप्यस्फोट

0
189

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. असं वक्तव्य करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी खळबळ उडवली आहे. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर हे वक्तव्य केलं. सोबतच महायुतीकडून बारणेंचा प्रचार योग्य रित्या सुरुये का? याबाबत ही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवलाय, असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपला ही डिवचले आहे. सुनील शेळकेंच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार शेळके यांच्या विधानामुळे खासदार बारणे यांच्या प्रचारात शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अजूनही गूळपीठ जमलेले नाही, अशी चर्चा सुरू आहे.

माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगलं आहे, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही, असं म्हणून गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलं नाही. हे शेळकेंनी बोलून दाखवलं. बारणेंच्या प्रचारात शेळकेंनी अशी वक्तव्य केल्यानं महायुतीत अद्याप समन्वय राखला गेलाय का? हा खरा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे.

बारणेंना उमेदवारी देण्यासाठr सुनील शेळकेंनी विरोध केला होता. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निव़डून येईल, असा उमेदवार मावळात आहे असेही ते म्हणाले होते. त्यानंतर ते प्रचारात सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अजित पवारांचा आदेश आला आणि सुनील शेळके बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाले. आमचे सर्वेसर्वा अजित पवार आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे. ती भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असं नाही आहे. शिवसेना, भाजप यांनीदेखील युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे, असं सुनील शेळकेंनी उघडपणे बोलून दाखवलं होतं.

त्यात आता बारणेंच्या प्रचारादरम्यानच त्यांनी खळबळ उडवून देणारं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यानंतर त्यांनी थेट महायुतीच्या टिकण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुढे यावर कोणाच्या प्रतिक्रिया काय उमटतात?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.