महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती विद्युत रोषणाईने उजाळून निघाल्या

66

पिंपरी, दि१२ (पीसीबी) – विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजाळून निघाल्या, रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सगळीकडे चैतन्यमय  वातावरण पसरले असून महापालिकेने स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी केली आहे.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने महापालिकेची पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळून निघाली आहे. तसेच सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींना देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबाबतचे जनजागृती करणारे ३२ बॅनर लावण्यात आले आहे. तसेच चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले असून याठिकाणी नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे.

सर्वच क्षेत्रीय कार्यालये आणि विविध ठिकाणी राष्ट्र ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत असून याठिकाणी नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात राष्ट्र ध्वज खरेदी केली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नागरिकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि  नागरिकांना चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरलेल्या पदयात्रेचे आयोजन क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करून जनजागृती करण्यात येत आहे. शहरात विविध  वृक्षरोपण करण्यात येत आहे यामध्ये नागरिकांचा समावेश मोठा आहे. प्लॉगेथॉन मोहीम, रक्दन मोहीम, ग्रंथोत्सव व्याख्यानमाला असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.      

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ .१५  वाजता महापालिकेच्या मुख्य भवनामध्ये ध्वजारोहण होणार आहे. महापालिकेचे  सुरक्षारक्षक दल, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वतीने पथ संचालन करण्यात येणार आहे.   स.९.३५ वाजता भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे देशभक्तीपर गीत्तांचा कार्यक्रम, स.१० वाजता निगडी येथे शालेय विद्यार्थ्यांद्वारे मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजासह विविध प्रतिकृतींचे सादरीकरण,  सायं. ५ वाजता भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे गाथा अमर क्रांतीविरांची हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.