महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे; उल्हास जगताप यांची खुर्ची गेली

0
268

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांची राज्याच्या नगरविकास विभागाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे स्थानिक अधिका-यांसाठीच्या तिस-या अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेल्या नगरसचिव उल्हास जगताप यांना खुर्ची सोडावी लागणार आहे.

पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये समावेश झाला असून नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. राज्य सेवेतील जितेंद्र वाघ आणि प्रदिप जांभळे महापालिकेत कार्यरत आहेत. तर, स्थानिक अधिका-यांसाठी असलेल्या तिस-या अतिरिक्त आयुक्तांचा प्रभारी पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे दिला होता.

महापालिकेतील स्थानिक अधिका-यांसाठी असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदावर पदोन्नती देण्याकरिता पालिकेतील एकही अधिकारी निकष पूर्ण करत नसल्याचे पालिका प्रशासनाने राज्य शासनाला कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश 18 नोव्हेंबर 2022 रोजी नगरविकास विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे साता-याचे जिल्हाधिकारी असताना थोरवे हे साता-याचे निवासी उपजिल्हाधिकारी होते. सिंह यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे सिंह यांनीच शिफारस करुन थोरवे यांना पालिकेत आणल्याचे बोलले जात आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी सिंह यांनी आणल्याचे दिसते.