महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढा – संजोग वाघेरे (पाटील)

0
200

पिंपरी (प्रतिनिधी) :-पिंपरी चिंचवड मनपाच्या चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत दुस-या मजल्यावरून खाली पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकारची घटना पुन्हा शहरात घडणार नाही. यासाठी प्रशासनाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात. तसेच, महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढावा. त्यासाठी आगामी अर्थसकंल्पात विद्यार्थी विमा योजनेसाठी आवश्यक तरतूद करावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे (पाटील) यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपाच्या चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत 16 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत शाळेतील आठवीचा विद्यार्थी सार्थक कांबळे याचा शाळेतील जिन्यातून दुस-या मजल्यावरून खाली येत पडून मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. महानगरपालिका प्रशासनाने व शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

        शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना सर्व शाळांमध्ये तातडीने राबविल्या जाव्यात. ते अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झालेले आहे. यासोबत महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणा-या गोर-गरिब पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी अपघात विमा योजना राबवावी. या योजनेअंतर्गंत विद्यार्थ्यांना अपघात झाल्यानंतर जखमी झाल्यास उपचार सुविधा व मृत्यू झाल्यास त्यांच्या पालकांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद करावी. शासन मान्यतेचे कागदी घोडे न नाचवता आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या विमा योजनेसाठी तरतूद करावी. विद्यार्थी विमा योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.

अनावश्यक प्रकल्प थांबवा, पण विद्यार्थ्यांसाठी तरतूद करा..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय कारकीर्रदीत अनेक अनावश्यक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी उधळपट्टी करणारे अनावश्यक प्रकल्प जे आता राबविण्याची आवश्यकता नाही. ते प्रकल्प थाबावावेत. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विद्यार्थी विमा योजना काढण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी संजोग वाघेरे (पाटील) यांनी याव्दारे केली आहे.