महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याची खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून विटंबना

0
142

देश, दि. १२ (पीसीबी) – इटलीमध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही वेळातच खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल वादग्रस्त मजकूरही लिहिण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ सदर परिसर स्वच्छ करून घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

इटलीमध्ये उद्या जी७ देशांची बैठक होणार असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जी७ देशांची ५० वी परिषद इटलीच्या अपुलीया प्रांतातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होत आहे. १३ ते १५ जून असे दोन दिवस ही परिषद चालणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या परिषदेची माहिती देताना सांगितले की, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अपुलीयाला रवाना होणार आहेत.