मराठा आरक्षणाच्या लढ्याला पिंपरीतून ताकद उभारणार : सतिश काळे

0
231

तीसर्‍या टप्प्यातील आंदोलनाची मराठा क्रांती मोर्चाकडून जय्यत तयारी

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – राज्यभरासह देशभरात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज बांधवांनी आंदोलनाचे रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सध्या जोरदार आंदोलने होत आहेत. दोन टप्प्यात आंदोलने पार पडली आहेत. या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी देखील सहभाग नोंदविला आहे. आता तिसर्‍या टप्प्यातील आंदोलनासाठी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पिंपरीतून ताकद उभारणार असा निर्धार मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या तीसर्‍या टप्प्यातील आंदोलनाला पिंपरी-चिंचवड मध्ये सुरूवात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांशी बैठका आयोजित करून या आंदोलनासाठी ताकद उभा करण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच पुढील दिशा ठरवली जात आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावर राज्यासह केंद्र सरकार पळवाट काढत आहे. आरक्षणाअभावी समाजावर अनेक संकटे येत आहेत. शिक्षण, रोजगार उपलब्ध होत नाही. यामध्ये आरक्षणाद्वारे संधी मिळेल,अशी भूमिका समाजाची आहे. त्यासाठी शासनाने लवकर निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र वेळकाढू भूमिकेमुळे समाजावर अन्याय होताना दिसत आहे. परिणामी मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्याचे आंदोलनात रुपांतर होत आहे.

मराठा क्रांती मोर्चा, उपोषण हा त्याचाच एक भाग आहे. नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण छेडले होते. चर्चा करण्याऐवजी हे आंदोलन राज्य सरकारकडून पोलिसांकरवी मोडण्याचा प्रयत्न झाला. त्याचा राग म्हणून जरांगे पाटलांसारखे नेतृत्व उदयास आले. त्यांना राज्यभरातून आणि पिंपरी-चिंचवड शहरातून देखील पाठिंबा मिळाला. पिंपरी शहरात दोन वेळा उपोषण छेडण्यात आले. एकदा शहर बंदची हाक देण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या टप्प्यात साखळी उपोषण करण्यात आले. यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सध्या जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील सातत्याने या प्रश्नाबाबत उपोषण, विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने करून, शासनाचे लक्ष वळविण्यात येणार आहे.

शहरात आंदोलनाचा तीसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. याची तीव्रता मोठी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, सजग नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांच्याशी बैठकांचे सत्र सुरू असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातून आम्ही देखील सातत्याने आंदोलने, उपोषण करत आहोत. आता तीसर्‍या टप्प्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी सर्व सामाजिक संघटनांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या सूचना,मते घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे सतिश काळे यांनी सांगितले.