मुंबई, दि. ८ (पीसीबी) – प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, ओबीसीमधून आरक्षण देण्याला आमचा ठाम विरोध आहे. निजामकालीन नोंदी पाहून कुणबी प्रमाणपत्र देणे आम्ही समजू शकत होतो. ११ हजार काही नोंदी आढळल्या होत्या. पण, आता सरसकट शाळांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी प्रमाणपत्रांवर मराठा असं लिहिलंय त्याच्या समोर कुणबी लिहिण्याचा प्रकार सुरु झालाय. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. याचा आम्हाला विरोध आहे. शिंदे समितीला असा कोणताही अधिकार नाही. मागास समाजाबाबत नोंदी शोधायच्या आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं हेसुद्धा कोठे घटनेमध्ये लिहिलं नाही. स्वतंत्र देशामध्ये कालेलकर आणि मंडल आयोगाची स्थापना करुन मागास समाजाचे सर्व्हेक्षण झाले आहे. त्यामुळे आता किती वेळा सर्व्हेक्षण करणार आहात, असा सवाल त्यांनी केला आहे.सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की मराठा समाज मागास नाही. मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला आहे. त्यामुळे आरक्षण ईडब्लुएसमधून घ्या, वाढवून घ्या पण ओबीसींमधून आरक्षण घेऊ नका. असं केलं तरंच मराठा-ओबीसी समाजात ताण निर्माण होणार नाही, असं शेंडगे म्हणाले.
सरसकट मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छगन भुजबळांचे समर्थन केले आहे. ते एकमेव मंत्री आहेत जे ओबीसींसाठी लढत आहेत. जी सर्वांनी भूमिका मांडली तीच भूमिका भुजबळांनी मांडली आहे.त्यामुळे त्यांना टार्गेट करणे योग्य नाही, असंही ते म्हणाले.