मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे प्रस्ताव सादर

0
223

पिंपरी, दि.२३(पिसीबी) – मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या मराठवाडावासियांनी अकरा प्रस्ताव हे मुंबई येथे मंत्रालयात मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. दरम्यान, या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

 मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विधानभवन व राजभवन येथे १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय झेंडा वंदन करण्यात यावे. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृति स्तंभाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दरवर्षी मानवंदना देण्यात यावी. पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात दोन दिवस मुक्तीसंग्रामावर आधारीत विशेष सत्र घेऊन हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपुढे आणावा. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा,  यासाठी दोन्ही सभागृहात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावा. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा राज्याच्या विधान भवनात व महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बसविण्यात यावा. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कलम ३७१ (अ) अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या इतिहासाचे पुर्नलेखन करण्याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकातून हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी विशेषांक प्रकाशित करण्यात यावा. मराठवाड्याचा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक, मुक्तीसंग्राम लढा, कृषी व सांस्कृतिक माहिती असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठवाडा सृष्टी संग्रहालय अजिंठा वेरुळ येथे उभारावे. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची प्रलंबित पेंशन प्रकरणे निकाली काढावीत.   

मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी खासदार हेमंत पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांना देण्यात आले. मराठवाडा जनविकास संघाने दिलेल्या या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मराठवाडा जनविकास संघाच्या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, नितीन चिलवंत, शंकर तांबे, अमोल लोंढे, मुरलीधर होनाळकर, धर्मवीर जाधव उपस्थित होते.