मराठवाडा जनविकास संघाचा उपक्रम

106

 

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) – लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भुकेल्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जेवण देऊन सांगवीतील पत्रकार कट्टा, माहेश्वरी चौक येथे रविवारी सकाळी करण्यात आला.

वायसीएम हॉस्पिटलमधील नर्स व आरोग्य सेवकांना, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलिसांना, सांगवीतील मजूर अड्डा येथील कामगार, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, पिंपळे गुरव, नखाते वस्ती, रहाटणी, दिघीमधील आरोग्य कर्मचारी यांना जेवणाचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिक, विद्यार्थी, पोलीस, आरोग्यसेवक, महापालिका कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. याबाबत बोलताना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड शहर परिसरात लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी बंद असल्याने अनेकजनांंच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने दररोज दोनशेहून अधिक गरजूंना ज्वारीची भाकरी, शेंगदाणा चटणी, खोबऱ्याची चटणी असे जेवण देण्यात येईल. यामध्ये विद्यार्थी, पोलीस, महापालिका कर्मचारी, आरोग्यसेवकांचा समावेश आहे. याबरोबरच मास्कचेही मोफत वाटप केले जात आहे. ही सेवा आम्ही १४ एप्रिलपर्यंत मोफत चालू ठेवणार आहोत.डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार यांना त्यांच्या मागणीनुसार कामाच्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन जेवण देतील, असेही अरुण पवार यांनी सांगितले.

कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रत्येकाने घरीच थांबावे. घरी बसून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी प्रत्येकाला आली आहे. खारीचा वाटा म्हणून भुकेल्या नागरिकांना जेवण देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहोत. पिंपरी चिंचवड शहरातील गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अरुण पवार यांनी केले.

वामन भरगंडे म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघ नेहमीच गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आलेली संस्था आहे. शहरात कोणीही उपाशी राहू नये, ही आमची भूमिका आहे.

संगिता जोगदंड म्हणाल्या, की मराठवाडा जनविकास संघाचे कार्य लोकाभिमुख आहे. सर्व नागरीकांनी घरात बसून देशसेवा करावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. आपला देश या महामारीला पळवून लावेल.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघा (अरुण कन्स्ट्रक्शन)च्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १.०० आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत जेवण देण्यात येईल. अधिक माहितीसाठी विजय वडमारे 9503447000, मराठवाडा जनविकास संघ कार्यालय 8308843370 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, वामन भरगंडे, शिवाजी सुतार, सतिश सावंत आदी उपस्थित होते.

WhatsAppShare