मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार

0
216

मुंबई, दि. 27 (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईतच मुक्काम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झालं. या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळाल्याचं मानलं जातंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशीमध्ये दाख होतील आणि त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार आहेत. यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे.

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय. त्यामुळे आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहे.