मनसेचा गुढी पाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष

0
130

दि 9 एप्रिल (पीसीबी )- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. राजकारणाची ज्यांना आवड आहे ते, राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्र सैनिकांना आज राज ठाकरे काय बोलणार? त्याची उत्सुक्ता आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच वार वाहत आहे. महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे. या सगळ्या राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. मनसे लोकसभा निवडणूक 2024 लढवणार का? मनसे, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे बाहेर राहून महायुतीला पाठिंबा देणार का? मनसे महायुतीमध्ये गेल्यास किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. राज ठाकरे यांच्या वकृत्व कौशल्याबद्दल प्रश्नच नाही. अगदी काही क्षणात समोरच्याला जिंकून घेण्याच कसब असलेला हा नेता आहे.

सध्या महाराष्ट्रात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा फक्त एकमेव आमदार आहे. पण म्हणून मनसेला जनाधार नाही, असं म्हणता येणार नाही. कारण सभेल जमणारी गर्दी त्यातून बरच काही स्पष्ट होतं. मनसेला मानणारा सुद्धा एक वर्ग आहे, भले तो अल्प असेल, पण तो आहे. म्हणूनच राज ठाकरे यांची दखल महायुतीला घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणी झाली? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. त्याची माहिती आज मिळू शकते.

अमित शाह यांची भेट घेऊन राज ठाकरे मुंबईत परतले. त्यानंतर वांद्र्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची तासभर चर्चा झाली. त्यानंतर मनसे महायुतीमध्ये येत्या एक-दोन दिवसात सहभागी होणार अशी चर्चा सुरु झालेली. पण आता या सगळ्यामध्ये मनसे कुठेच दिसत नाहीय. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार की, लोकसभा निवडणूक लढवणार नाही? असा प्रश्न मनसैनिकांच्या मनात आहे. त्याच उत्तर आज मिळू शकतं. अन्य गुढी पाडवा मेळाव्यांपेक्षा आजचा गुढी पाडवा मेळावा जास्त खास आहे.