मंत्री दादा भुसे यांनी काेट्यवधींचा घाेटाळा केल्याचा आराेप

75

नगर, दि. २१ (पीसीबी) – खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) दादा भुसे यांच्यावर गंभीर आराेप केले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी काेट्यवधींचा घाेटाळा केल्याचा आराेप संजय राऊत यांनी केलाय. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. येत्या २६ मार्चला मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे.

मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आराेप करणारे हे ट्विट असून, भुसे यांनी गिरणा अॅग्राे नावाने हजाराे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. विधिमंडळाचे अधिवेशनात या आराेपाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल’, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ईडी आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी या ट्विटमध्ये टॅग केले आहे. दादा भुसे हे शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) आहेत. २० वर्षाहून अधिकाळापासून पक्षाचं काम करत आहेत. त्यांनी २००४ मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा पराभव केला. यानंतर भुसे मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग चारवेळा दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते. ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना कृषीमंत्रीपद दिलं होतं. सध्या त्यांच्याकडे शिंदे सरकारमध्ये त्यांना बंदरे आणि खनिकर्म हे खातं देण्यात आलं आहे.