विदेश,दि.०८(पीसीबी) – पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपाच्या चौकशी प्रकरणी पोर्तुगाल पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी छापाही मारला होता. पोलिसांच्या छाप्यानंतरच पंतप्रधान एंटोनियो यांनी राजीनामा दिला.एंटोनियो यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारलेला नाही. पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा हे लवकरच एंटोनियो यांचा राजीनामा स्वीकारतील असं म्हटलं जात आहे.
2015 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान बनलेले एंटानियो कोस्टा हे सोशलिस्ट पक्षाचे नेते आहेत. त्यांनी आपण निर्दोष असल्याचंही राजीनामा देताना म्हटलं. आरोप होत असतानाही पाठिंबा दिलेल्यांचे एंटोनियो यांनी आभार मानले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. एंटोनियो म्हणाले की, मी गुन्हेगारी चौकशीचा विषय बनलो हे ऐकूनच धक्का बसला. कोणत्याही चुकीच्या गोष्टी मी केलेल्या नाहीत.
दरम्यान पंतप्रधान एंटोनियो यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनी म्हटलं की, पंतप्रधान बुधवारी संसद बोलावत आहेत. गुरुवारी राज्य परिषदेच्या बैठकीनंतर ते देशाला संबोधित करतील. पोर्तुगालच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या लिथियम खाणी आणि दक्षिण किनारपट्टीवरील सायन्समध्ये हरित हायड्रोजन आणि डाटा सेंटर योजनेत पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराची त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.