भोसरी विधानसभेसाठी मी इच्छुक – अजित गव्हाणे

0
221
  • भाजप आमदार महेश लांडगे यांचे टेन्शन वाढणार

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणूक निकाल लागला आणि देशात एनडीए चे सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार हे निश्चत झाले. रविवारी सायंकाळी मोदी यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकिचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छकांनी मोर्चेबांधनी सुरू केली आहे. भोसरी विधानसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज प्रथमच पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
थेरगाव येथील माजी नगरसेविका माया बारणे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना गव्हाणे यांनी आपण भोसरी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहिर केले.
भोसरी मतदारसंघ हा कायम चर्चेत असतो. २००९ पासून या मतदारसंघातील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्याने सर्वांचे लक्ष असते. २०१४ मध्ये अपक्ष आणि नंतर २०१९ मध्ये भाजपकडून महेश लांडगे आमदार इथे निवडूण आले. आता यावेळी ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप मधूनच आमदार लांडगे यांच्या विरोधात धुसफूस आहे. काही बलाढ्य माजी नगरसेवकांनी आता आमदार लांडगे यांच्या विरोधात मोर्चेबांधनी सुरू केल्याने खळबळ आहे. तोडिस तोड उमेदवार आमदार लांडगे यांच्या विरोधात रिंगणात उतरला तर लढत रंगतदार होईल, अशी चर्चा राजकारणात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून खुद्द शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीच इच्छा प्रगट केल्याने भाजपातील लांडगे विरोधक सुखावले आहेत. वीस वर्षे राजकारणात असूनही कुठला डाग नसल्याने स्वच्छ प्रतिमा, अफाट जनसंपर्क, विनम्र व मितभाषी स्वभाव, सर्व राजकीय आणि प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव, प्रभावी वकृत्व असल्याने गव्हाणे यांच्याबद्दलचे जनमत चागंले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना गव्हाणे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात शहरातील आजवरचा सर्वात मोठा म्हणजे तब्बल १० हजार कार्यकर्त्यांचा मोर्चा काढला होता.
सर्व थरातील सामान्य जनता तसेच व्यापारी-उद्योजकांमध्ये अजित गव्हाणे यांचे नाव परिचित आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे सलोख्याचे सबंध असल्याने ते भोसरीतून आमदार लांडगे यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण करू शकतात, अशी शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेला महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीसुध्दा कायम राहणार असल्याचे दोन्ही बाजुंच्या नेत्यांनी अगोदरच स्पष्ट केल्याने कोंडी झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांची महायुती आहे. विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. भाजपमधून मावळते आमदार म्हणून महेश लांडगे यांचा दावा या जागेवर असणार आहे. तिथेच गव्हाणे यांनीही इच्छा व्यक्त केल्याने गोंधळ वाढणार आहे. महायुती कायम राहिल्यास आमदार लांडगे हेच लढण्याची दाट शक्यता आहे मात्र, सर्व पक्ष स्वतंत्रपण लढले तर अजित गव्हाणे यांच्याच नावावर राष्ट्रवादीतून शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता अधिक आहे.