भोसरीत ‘उद्योग सुविधा हेल्पडेस्क’ लवकरच केला जाणार कार्यान्वित!

0
20

: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती, स्थानिक उद्योजकांसोबत साधला संवाद*

पिंपरी, दि. १९ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या ‘उद्योग सुविधा कक्षाचे’ हेल्प डेस्क भोसरी येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अँग्रीकल्चर (MCCIA) कार्यालयातून लवकरच कार्यान्वित होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

महानगरपालिकेच्या ‘उद्योग सुविधा कक्षा’ची संकल्पना व कार्यपद्धती याबाबत चर्चेसाठी ‘एमसीसीआयए’ ने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या कार्यक्रमास एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष दिपक करंदीकर, संचालक सुधनवा कोपर्डेकर, महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे तसेच अनेक स्थानिक उद्योजक उपस्थित होते.

राज्य सरकारच्या ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ उपक्रमांतर्गत ‘गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रमा’चा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘व्यवसाय सुलभता’ संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ‘ हा कक्ष कार्यान्वित केल्यामुळे महानगरपालिका व उद्योजक यांच्यातील संवाद वाढीस लागून उद्योजकांना भेडसावत असणारे प्रश्न सुटण्यास मदत होईल. ‘शासन आपल्या दारी’ या धर्तीवर एमसीसीआयएच्या भोसरी येथील कार्यालयात उद्योग सुविधा कक्षाचा एक हेल्पडेस्क कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे बहुतेक उद्योजकांचा वेळ वाचेल व त्यांच्या समस्यांचे निराकरण वेळेत पूर्ण होईल.
उद्योग सुविधा कक्षाच्या माध्यमातून संवाद सातत्य व उद्योग स्नेही धोरणांच्या आखणीवर भर देण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या स्तरावर दरमहा एकदा आणि आयुक्त स्तरावर तीन महिन्यांतून एकदा बैठका घेऊन स्थानिक समस्यांचे निराकरण व धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. यासोबतच उद्योग क्षेत्राला कौशल्य विकास केंद्रामार्फत कुशल मनुष्यबळ पुरविण्यास मदत, कामगारांना सामाजिक सुविधा मिळण्यासाठी सहकार्य तसेच सीएसआर माध्यमातून उद्योगांना शहराच्या विकासासाठी प्रकल्प सुचविणे अशा अनेक सेवा या कक्षामार्फत देण्यात येणार आहेत.’

कार्यक्रमात एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष दिपक करंदीकर यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे सर्व उद्योजकांच्या वतीने स्वागत केले, आणि या उपक्रमास संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.