भारत-कॅनडा संबंधात मोठी अपडेट! व्हिसा सेवा पुन्हा सुरु

0
146

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दोन महिन्यांनतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तहेर एजेन्सीने केल्याचा आरोप कॅनडाने केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडाच्या दाव्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर गेले होते. भारताने दोन महिन्यांपूर्वी कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. कॅनडाने या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली होती.
कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने हे सकारात्मक पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. फ्री प्रेस जनरलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. व्यावसायिक कामासाठी अनेक कॅनडियन नागरिक भारतात येत असतात. भारत सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
भारत सरकारने काही विशिष्ठ श्रेणीतील नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यानंतर आता ई-व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅनडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने व्हिसासाठी अप्लाय करता येणार आहे.