भाजप नेत्याने फेसबुक लाईव्ह दरम्यान राष्ट्रध्वज ठेवला उलटा..!

62

देश,दि.१६(पीसीबी) – कर्नाटकातील यशवंतपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष भाजप नेते अनिल चालगेरी गेल्या आठवड्यात हर घर तिरंगा मोहिमेदरम्यान फेसबुक लाइव्ह व्हिडिओवर राष्ट्रीय ध्वज संहितेचा अपमान केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

अनिल चालगेरी यांनी गेल्या आठवड्यात हर घर तिरंगा या मोहिमेची माहिती देण्याकरता एक लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. या लाईव्ह दरम्यान त्यांनी आपल्या पाठीमागे भारताचा राष्ट्रध्वज उलटा ठेवला होता. वरती हिरवा रंग आणि खाली भगवा अश्या पद्धतीने हा ध्वज त्यांनी ठेवला होता.

हे लाईव्ह पाहणाऱ्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. तेव्हा त्यांनी लगेचच हे लाईव्ह थांबवले. परंतु तोपर्यंत अनेकांनी ह्या
व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून घेतले होते. त्यानंतर हे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाले. चालगेरी यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदारांपैकी एकाने सांगितले की, ही घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती आणि 10 ऑगस्ट रोजी केंगेरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.