भाजपाकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू

66

– देवेंद्र फडणवीस तातडिने दिल्लीकडे रवाना, अमित शाह यांच्या बरोबर चर्चा कऱणार

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजप आणि शिंदे गट एकत्र सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. मात्र, मंत्रीपदासाठी मंथन सुरू आहे. शिंदे गटातील आठ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्याचबरोबर पाच राज्यमंत्री केले जाऊ शकतात. दरम्यान, फडणवीस यांनी भाजपा कोअर ग्रुपची बैठक उरकताच आज सकाळी तातडिने दिल्लीकडे कूच केली असून मंत्रीमंडळ कसे असावे याबाबत महत्वाची चर्चा ते कऱणार असल्याचे समजते.

नोटीस प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, तत्काळ निर्णय होऊ न शकल्याने बंडखोर आमदारांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गुवाहाटीला पोहोचलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटीसला न्यायालयाने 12 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना आज ईडीने समन्स बजावले आहे.

बंडखोर आमदारांना विश्रांती देण्याचे आदेश : संजय राऊत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीस आणि सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत दिलेली स्थगिती यावर प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले,” गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचे महाराष्ट्रात कोणतेही काम नाही. त्यांना 11 जुलैपर्यंत तेथे विश्रांती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”