भाजपसाठी ट्रेलर असा होता, आता पिच्चर कसा असेल ?

0
182

जगाती सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकिचा पहिला टप्पा शुक्रवारी पार पडला. ५४३ पैकी १०२ जागांसाठी २१ राज्यांत मतदान झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मतदानाचा २ ते १० टक्केपर्यंत एकदम घसरला. महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांवर आश्वासनांशिवाय रिझल्ट नसल्याने मतदारांत निरुत्साह दिसला. आता हा घसरलेला टक्का मोदींसाठी म्हणजेच सत्ताधारी भाजपसाठी धोक्याची घंटा समजला जातो. पहिल्या टप्प्या सारखाच ट्रेंन्ड पुढे कायम राहिला तर, मोंदीना धोका संभवतो. अब की बार ४०० पार चा नारा थेट २२० ते २५० पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. निवडणूक अभ्यासक प्रदीप गुप्ता यांचे बहुतांश अंदाज तंतोतंत खरे ठरतात आणि त्यांचाच एक अहवाल लिक झाला आणि देशभर व्हायरल झाल्याने भाजपचे धाबे दणानले आहे. दरम्यान, गुप्ता यांनी आता तो अहवाल माझ्या संस्थेचा अधिकृत अहवाल नसल्याचा खुलासा करण्याची वेळ आल्याने आणखी गूढ वाढले आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी जे मतदान झाले त्यात मोठ्या राज्यांतून प्रामुख्याने पश्चिम बंगाल (७७.५७ टक्के) मध्ये चागंले मतदान आहे. मात्र, उत्तर प्रदेश (५७.६१ टक्के), मध्य प्रदेश (६३.३३ टक्के), छत्तीसगड (६३,४१ टक्के) उत्तराखंड (५७.६१ टक्के) बिहार (४७.४९ टक्के), महाराष्ट्र (५५.२९ टक्के), तमिळनाडू (६२.१९ टक्के), राजस्थान (५७.९५ टक्के), आसाम (७१.३८ टक्के) या राज्यांतून २०१९ च्या तुलनेत मतदान घटलेले आहे. सरासरी २ ते १० टक्के कमी मतदान हा भाजपसाठी चिंतेचा विषय समजला जातो.

२०१४ मध्ये मोदींचे सरकार आले तेव्हा मतांची टक्केवारी सरासरी ८.५ टक्केने वाढलेली होती. मोदी लाट २०१९ पर्यंत बहरात होती. आता २०२४ मध्ये मोदींचा चमत्कार ओसरल्याचे चित्र आहे. काल पार पडलेल्या राज्यांची मागची आणि आताची टक्केवारी तुलना केली असता त्याचे प्रत्यंतर येते. उत्तर प्रदेशात २०१९ मध्ये ६६.१० टक्के मतदान झाले होते, तिथे आता पहिल्या टप्प्यात अवघे ५७ टक्के झाले. थेट दहा टक्क्यांनी घसरगुंडी ही बदलाची लक्षणे समजली जातात. देशातील सर्वाधीक ८२ जागा असलेल्या राज्यात पहिल्या टप्प्यात ही स्थिती आहे. बिहार राज्यात गतवेळी ५३ टक्के मतदान झाले होते आता त्याच जागांवर अवघे ४६ टक्के मतदान झाले. नितीश कुमार आणि भाजप एक होऊनही मतदान एकदम ७ टक्के कमी झाल्याने भाजप गोटात चिंतेचे वातावरण आहे. राजस्थानात २५ पैकी १२ जागांसाठी मतदान झाले. या राज्यात भाजप शंभर टक्के जागा जिंकते. तिथे २०१९ मध्ये ६४ टक्के मतदान होते ते थेट १३ टक्क्यांनी घसरून ५१ टक्के पर्यंत खाली आले आहे. भाजपचे वर्चस्व असलेले दुसरे महत्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश. तिथे गेल्यावेळी तब्बल ७५ टक्के मतदान झाले होते आता ते पहिल्या टप्प्यातच ६३ टक्केपर्यंत खाली घसरलेले आहे. महाराष्ट्रातील तोडफोडीच्या राजकारणाचा मोठा फटका भाजपला बसणार असे दिसते. विदर्भातील पाच जागांवर काम मतदान झाले. जिथे गेल्यावेळी ६४ टक्के मतदान होते तिथे आता अवघे ५४ टक्के झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकित सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. मोदींच्या दुसऱ्या निवडणुकित २०१९ मध्ये एक टक्का वाढ होऊन तो ६७ टक्के पर्यंत गेला होता. आता पहिल्याच टप्प्यात तो ६० टक्के पर्यंत खाली आल्याने भाजप साठी धोक्याची घंटा वाजली आहे. अशाच प्रकारे पुढचे टप्पे झालेच तर सरासरी ६० टक्के पेक्षाही कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. आताच्या १०२ जागांपैकी २०१९ मध्ये ४० जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता त्यातील १६ जागांवर पराभवाची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अशीच वाटचाल कायम राहिली तर ३०३ जागांचे संख्याबळ असलेल्या भाजपला थेट ८० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या एककल्ली कारभाराला विरोधकां प्रमाणेच भाजप अंतर्गत विरोध वाढला आहे. मातृसंस्था असलेल्या रा.स्व.संघालाही मोदी-शहा जुमानत नसल्याचा संदेश भाजपच्या निष्ठावंतामध्ये गेल्याने त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुस्लिम अल्पसंख्यांक, दलित यांच्यातील नाराजीचाही भाजपला फटका बसू शकतो.