भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी आऊट, फडणवीस इन

69

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या निवडणूक प्रचार समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. तर निवडणूक प्रचार समिती आणि संसदीय समितीतून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना डच्चू देण्यात आला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही या संसदीय समितीत घेण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष असणार आहे. संसदीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा राहणार आहेत. भाजपची ही संसदीय समिती एकूण 11 सदस्यांची आहे. या समितीतून दोन नेत्यांना वगळण्यात आलं आहे. तर तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जेपी नड्डा हे संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. भाजपने ज्या तीन नव्या चेहऱ्यांचा संसदीय समितीत समावेश केला आहे. त्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा. के. लक्ष्मण आणि सर्वानंद सोनोवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे नेते नितीन गडकरी यांची संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीतून उचलबांगडी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बोर्डाचे सदस्य –
जेपी नड्डा (अध्यक्ष)
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
अमित शाह
बीएस येडियूरप्पा
सर्वानंद सोनोवाल
के. लक्ष्मण
इक्बाल सिंह लालपुरा
सुधा यादव
बीएल संतोष (सचिव)

याशिवाय भाजपने निवडणूक प्रचार समितीचीही घोषणा केली आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि ओम माथूर यांना स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यात स्थान देण्यात आलं नाही.