भाजपचे मोठेपण की खोटेपण, लोक हो तुम्हीच सांगा !!! – थर्ड आय – अविनाश चिलेकर

211

संस्कार, संस्कृती, सौजन्य, औदार्य वगैरे शब्द आता भाजपच्या शब्दकोषात शोभत नाहीत. कुटील राजकारणासाठी जे जे शब्द पूर्वी काँग्रेससाठी वापरले जात ते सगळे आता चपखल भाजपसाठी लागू पडतात. खोटारडेपणा, दांभिकपणा, निर्ढावलेपणा, खुनशीपणा, ब्लॅकमेलिंग अशा बऱ्याच लाखोल्या वाहता येतील. कारणही तसेच आहे. अंधेरी पूर्व मध्ये शिवेसना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरची पोटनिवडणुक. भाजपने या जागेसाठी दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नीबाबत जे कटकारस्थान केले, छळवाद आरंभला तो तमाम मराठीजनांसाठी असह्य होता. खरे तर आपल्या संस्काराला धरून ही निवडणूक तशी बिनविरोध होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात शिवसेनेची जिरवायच्या नादात भाजपने स्वतःची शोभा करून घेतली. राजकारण किती खालच्या पातळीवर घसरले याचेही प्रदर्शन झाले. त्यामुळे लोक संतापले होते आणि भाजपचा मस्तवालपणा लोकांच्या डोक्यात गेला होता. मनोमन सर्वांनी भाजपला झटका द्यायचे ठरवले होते. सर्वेक्षणातील अंदाज तेच सांगत होते. अंधेरी पूर्व ची निवडणूक झाली असतीच तर तो ४४० व्होल्टचा करंट बसला असता आणि तो भाजपला सहन झाला नसता.यदाकदाचित त्याचाच परिणाम पुढे मुंबई महापालिका निवडणुकिवरसुध्दा झाला असता. आता त्यावर मखलाशी करत मोठ्या साळसूदपणे भाजपने आव आणला आणि माघारीचे नाट्य वठवले.

मनसे नेते राज ठाकरे यांनीही अगदी आयत्यावेळी भाजपला माघार घेण्यासाठी पत्र काढले की त्यांना फडणवीस यांनी काढायला लावले. होय, राज ठाकरे यांना तसे वाटत होते तर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच भाजपला तसे पत्र दिले पाहिजे होते. शरद पवार आणि आशिष शेलार यांना महाराष्ट्र क्रीकेट असोसिएशन च्या निवडणुकिचे समिकरण या निवडणुकित दिसले. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना आता आमदार लटकेंची आठवण आली. सगळ्यांना एकदम उमाळा आला तेव्हाच मनात पाल चुकचूकली. भाजपला पराभव स्पष्ट दिसत होता. खासगी तसेच वर्तमानपत्रांचे अंदाज, राजकिय निरिक्षकांचे मत तेच सांगत होते. म्हणूनच फडणवीस यांनी रातोरात बैठक घेतली आणि सर्व मान्यवरांच्या शब्दाला मान देत असल्याचा देखावा केला. आपला संस्कार, संस्कृती म्हणून मुरजी पटेल यांची उमेदवारी माघार घेत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. वाजपेयी अडवाणी यांचे संस्कार भाजपवर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. अशाच पध्दतीने निधन झालेल्या आमदारांच्या जागेवर कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर अशा तीन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. त्यावेळी कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म असा प्रश्न आता भाजपला विचारला पाहिजे. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी तो धाग पकडून भाजपचा उध्दार करताना तोच आरसा दाखवला. सत्तेच्या राजकारणासाठी एकेकाळी आपला जीवश्चकंठश्च मित्र असलेल्या शिवसेनेला सुरुंग लावला इथपर्यंत ठिक होते. पण त्यानंतरसुध्दा शिंदे गटाचे ४० आमदार आणि १२ खासदार यांना हाताशी धरून अमित शहा यांनी जे मनमानी, हुकूमशाही राजकारण केले त्याची शिसारी येते. संस्कार, संस्कृतीचे रक्षणकर्ते किंवा राजकारणाचे शुध्दीकरण करण्यासाठी लोक इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून भाजपकडे पहात होते. आता मुख आणि मुखवटा वेगळे असल्याचे लक्षात आले.

पोट निवडणूक जिंकायचीच ही जिद्द समजू शकते, पण त्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरुन जी काही कृष्णकृत्ये केली त्यात भाजपची शोभा झाली. भाजपने निवडणूक आयोग स्वायत्त असतो, निःपक्ष असतो या तर्काला सुरूंग लावला. सुरवातीला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवायचे कारस्थान केले, नंतर चिन्हाचे भांडण काढले आणि शिंदे – ठाकरे गटाचे कोंबडे झुंजवले. त्यासाठी कोर्ट कचेरी करणे भाग पाडले. शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला आणि मशाल मनासारखे चिन्ह मिळाले तर तिथेही रडिचा डाव सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरशः कळसुत्री बाहुल्याप्रमाणे वागत असल्याचे पावलापावली दिसले, त्यांचे स्वतःचेही हसे झाले. शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन फडणवीस बार टाकत राहिले. ऋतुजा लटके यांची उमेदवारी भाजपला जड जाणार हे जसे स्पष्ट झाले तसे श्रीमती लटके यांची शिवसेनेकडून उमेदवारी येऊच नये यासाठी आटापीटा केला. श्रीमती लटके यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी घ्यावी यासाठीही दबाव तंत्र वापरले. आपले पती ठाकरे यांचे निष्ठावंत होते आणि आपणही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनच लढणार असे ज्यावेळी लटके यांनी निक्षून सांगितले तिथेच भाजपची पाचवर धारण बसली. लटके यांच्यासारख्या महापालिकेतील तृतिय श्रेणीच्या लिपीकाचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये यासाठी भाजपने आकाश पाताळ एक केले. अखेर उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाचा कान पकडल्यावर राजीनामा मंजूर करण्याची नामुष्की आली. नंतर श्रीमती लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा उद्योग झाला. वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने भाजपचा खोटेपणा उघड केला आणि त्यातून फडणवीस यांच्या प्रतिमेलाही तडा गेला. उमेदवारी अर्ज दाखल करताना तीन-पाच हजाराची रॅली काढून भाजपनेही शक्ती प्रदर्शन केले, पण तिथेही फसगत झाली. मराठी विरुध्द गुजराथी मतांचा टक्का असे मतांचे ध्रुवीकरणसुध्दा भाजपच्या अंगलट आले. कारण पटेल यांची गुजराथी मिश्र मराठी खटकत होती. एकनाथ शिंदे यांचा बळीचा बकरा भाजपने केला आणि त्या आधारे शिवसेनेला आव्हान देण्याचे राजकारण केले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबरच तमाम मुस्लिम मते, दाक्षिणात्य मतेसुध्दा भाजपाच्या विरोधत असल्याचा अंदाज आला. वारे कुठे वाहते हे चाणाक्ष फडणवीस यांनी जाणले आणि नंतर मनसेचे राज ठाकरे यांचे पत्र, सरनाईक यांचे पत्र असे एक एक संस्कार, संस्कृतीची भाषा बोलत पुढे आले.

मुंबई महापालिका जिंकायचीच म्हणून अंधेरी पूर्व ही रंगीत तालिम होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकली असतीच तर भाजपला हत्तीचे बळ मिळाले असते. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा प्राण असल्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबई घ्यायचीच आणि शिवसेना संपवायची हा भाजपच्या शहा-मोदी यांचा अजेंडा आहे. गेल्यावेळी भाजपचा हातातोंडाशी आलेला घास गेला. आता हैद्राबाद महापालिके प्रमाणे मुंबईसाठी सगळे केंद्रीय मंत्री, राज्य सरकार, सर्व यंत्रणा उभा करायची अशी व्युहरचना ठरलेली आहे. त्यासाठी अंधेरी पूर्व ही नांदी ठरली असती. शिवसेनेला राष्ट्रवादी, काँग्रेससह अन्य दलित, मुस्लिम मतांचे कडबोळे जमवता आले तर ठिक अन्यथा मुंबई आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रावर भाजप एकहाती सत्ता आरामात घेणार हे आज स्पष्ट दिसते. कदाचित डिसेंबर मध्ये मुंबई सह राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होतील. २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकिसाठी ती रंगीत तालिम असेल. शिवसेना संपणार की दुप्पट वाढणार ते महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकिनंतर समजेल. तोवर अंधेरी पूर्व चे मतदान, मतमोजणी आणि निकाल यावर चर्वीतचर्वण सुरू राहिल. भाजप चे मोठेपण की खोटेपण ते आता जनतेने मतपेटीतून सांगावे.