भाजपचे चीन कनेक्शन, आजवरच्या १२ गुप्त बैठकांचे सादर केले पुरावे – काँग्रेसचा मोदींना सवाल

0
93

नवी दिल्ली : भाजपचे चीनशी निकटचे संबंध असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न केले आहेत. त्याचबरोबर भाजपनेते आणि चिनी कम्युनिस्ट नेते यांच्यात २००८पासून झालेल्या १२ उच्चस्तरीय बैठकांची इतिवृत्ते जाहीर करावीत, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात भाजपचे चीनशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात झालेल्या अनेक द्विपक्षीय बैठकांची फलश्रुती काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. खेरा म्हणाले, की जून २०२०मध्ये लडाखमधील कारवायांप्रकरणी मावळत्या पंतप्रधानांनी चीनला ‘क्लीन चिट’ दिल्यापासून, भाजप चीनविरोधात बोलण्यास का धजावत नाही? यामागे भाजप आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे घनिष्ठ संबंध हे कारण आहे का, असाही प्रश्न खेरा यांनी विचारला आहे. भाजपचे नेते आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांच्यात २००८पासून किमान १२ बैठका झाल्या आहेत. त्यापैकी बहुतेक बैठका चीनमध्येच झाल्या, असा दावाही खेरा यांनी केला.

खेरा म्हणाले की ऑक्टोबर २००८मध्ये १५ सदस्यांच्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली होती. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी चीनशी सकारात्मक संबंधांसाठी भाजप अनुकूल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जानेवारी २००९मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि पक्षाच्या पॉलिट ब्युरोची भेट घेण्यासाठी भाजप-रा.स्व.संघाच्या पदाधिकाऱ्यांचे एक पथक पाच दिवसांच्या बीजिंग- शांघाय दौऱ्यावर गेले होते, असा दावाही खेरा यांनी केला.

भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी जानेवारी २०११मध्ये चीनला गेले होते. तेथे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची सदिच्छा भेट घेतली होती, असेही खेरा यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रश्न
● भाजपचे नेते आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांच्यात सन २००८पासून १२ बैठका झाल्या.

● भाजप आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात वारंवार का बैठका झाल्या? प्रत्येक बैठकीत नेमके काय झाले?

● भाजपचे नेते चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘शाळेत’ का गेले होते? त्यांना तेथे कोणते ‘शिक्षण’ मिळाले?

● डोकलाम सीमेवर जून २०१७मध्ये संघर्ष झाला असताना भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चिनी कम्युनिस्ट पक्षाला का भेटले होते? त्यांच्यातील नाते नेमके काय आहे?