भाच्याच्या अपहरण प्रकरणी मामांवर गुन्हा दाखल

76

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – मामांच्या सांगण्यावरून त्याच्या पाच साथीदारांनी भाच्याचे अपहरण केले. भाच्याचे वडील दुसरे लग्न करत असल्याने त्याला दमदाटी करून मारहाण करत त्याचा पाय फ्रॅक्चर केला. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी साडेसात ते साडेआठ वाजताच्या कालावधीत केळगाव आणि भोसरी येथे घडली.

दत्तात्रय तुकाराम ढेरंगे, अशोक रंभाजी ढेरंगे (रा. गुळाणी, ता. खेड) आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय यांच्या भाच्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी सकाळी साडेसात वाजता केळगाव येथील सिद्धबेट जवळ इंद्रायणी नदीच्या पुलावर आले असता अनोळखी पाच जणांनी त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. फिर्यादींना भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात आणून त्यांना जबरदस्तीने बसवून ठेवले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी फिर्यादी यांचे मामा दत्तात्रय ढेरंगे याला फोन केला. तासाभराने फिर्यादीचा मामा दत्तात्रय ढेरंगे आणि चुलत मामा अशोक ढेरंगे असे तिथे आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत, तुझ्या बापाला लै माज आलाय का, तो दुसरे लग्न कसे करतो तेच आम्ही बघतो अशी दमदाटी करत लाकडी काठीने पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. यात फिर्यादींचा पाय फ्रॅक्चर झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.