भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली ऑस्ट्रेलियन सिनेट सदस्य बॅरीस्टर वरुण घोष यांनी

54

सिडनी, दि. ७ (पीसीबी) – भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन सिनेट सदस्य बॅरीस्टर वरुण घोष हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मंगळवारी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. त्यानंतर वरुन घोष यांच्या नावाची चर्चा होते आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिनेट सदस्यांपैकी गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे ते पहिले सिनेट सदस्य आहेत.

पश्चिम ऑस्ट्रेलियाचे वरुण घोष यांना विधान परिषदेने त्यांना संघीय संसदेच्या सिनेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी वरुण घोष यांचं अभिनंदन केलं आहे. वरुण घोष यांनी संसदेत येणं अद्भुत आहे असं वोंग यांनी म्हटलं आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पेनी वोंग यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की पश्चिम ऑस्ट्रेलियाचे आमचे सर्वात सिनेट सदस्य वरुण घोष यांचं आम्ही स्वागत करतो. घोष हे पहिले असे सिनेट सदस्य आहेत ज्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. अशी सुरुवात करणारे ते पहिले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही वरुण घोष यांचं अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले वरुण घोष?
वरुण घोष हे जेव्हा १७ वर्षांचे होते तेव्हा त्यांच कुटुंब भारतातून ऑस्ट्रेलियात आलं. वरुण घोष म्हणाले मी स्वतःला भाग्यवान समजतो मला खूप चांगलं शिक्षण मिळालं. मी चांगली गुणवत्ता असलेल्या शिक्षणावर विश्वास ठेवतो. तसंच मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला एका योग्य प्रशिक्षणाची गरज असते. ते त्याला उपलब्ध करुन दिलं पाहिजे.

वरुण घोष हे पेशाने वकील आहेत
वरुण घोष हे पेशाने वकील आहेत. वरुण घोष ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात राहतात. त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून कला आणि विधी शाखेतली पदवी घेतली आहे. सुरुवातीला वरुण घोष न्यूयॉर्कमध्ये फायनान्स अटर्नी तसंच वॉशिंग्टन वर्ल्ड बँकेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. वरुण घोष यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पर्थमधल्या लेबर पार्टीमधून केली होती.