भक्ती शक्ती चौकात शनिवारी वाजणार १००० पेक्षा जास्त ढोल, ३५० ताशे

443

शिवजयंती समन्वय समिती आणि ढोलताशा महासंघाने केले आयोजन

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास आणि हिंदू साम्राज्य वर्षास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील शिवप्रेमी नागरिक शनिवारी (दि.१६ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता निगडी, भक्ती शक्ती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयन महाराज भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समितीचे समन्वयक संदीप जाधव यांनी बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड सहकार्यवाह जयंत जाधव, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष विशाल मानकर, शिवजयंती समन्वय समितीचे कुणाल साठे, माजी नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे आणि अमित गावडे आदी उपस्थित होते. अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती आणि ढोल ताशा महासंघ आणि शिवप्रेमी नागरिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ५५ ढोल पथक, ३५० ताशे आणि १००० पेक्षा जास्त ढोल ३५ मिनिटे वाजवून भगव्या ध्वजाची मानवंदना देण्यात येणार आहेत. यावेळी मराठी सुभेदार या चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या भव्य दिव्य कार्यक्रमाला शहरातील शिवप्रेमी बंधू, भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.