बिबट्याला प्रसंगावधानाने जेरबंद करणाऱ्या शांता शेळके यांचा महावितरणकडून सत्कार

0
94

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले कौतुक

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पुणे, : चांडोली (ता. राजगुरूनगर) येथे महावितरणच्या मीटर चाचणी कक्षात शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधाने जेरबंद करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा गुरुवारी (दि. ११) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते रास्तापेठ येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. ‘जिगरबाज वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचे धैर्य व प्रसंगावधान अतुलनीय आहे’ अशा शब्दांत श्री. पवार यांनी कौतुक केले.

याबाबत माहिती अशी, की चांडोली (ता. राजगुरुनगर) येथे एकाच परिसरात महावितरणचे राजगुरुनगर उपविभाग कार्यालय, दोन शाखा कार्यालय, मीटर चाचणी कक्ष व भांडार कक्ष आहे. एकाच खोलीत असलेल्या मीटर चाचणी कक्षामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके बुधवारी (दि. १०) मीटर चाचणीचा अहवाल तयार करीत होत्या. सकाळी १०.४५ वाजता मीटर चाचणी कक्षाच्या दरवाजातून बिबट्याने प्रवेश केला. मात्र दरवाजासमोरच टेबलवर अहवाल लिहण्याचे काम करीत असलेल्या शेळके यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. त्याचवेळी बाहेरून एका कर्मचाऱ्याचा ‘वाघ आला’ अशी अस्पष्ट आरोळी त्यांनी ऐकली. त्यानंतर दुसऱ्याच क्षणाला टेबलच्या बाजूला मिटर बॉक्सचा आवाज झाला. त्याकडे शेळके यांनी पाहिले असता बिबट्याचे दर्शन झाले. मात्र अत्यंत धैर्याने व प्रसंगावधान राखून शांता शेळके यांनी हळूच दरवाजा गाठला व बाहेरून बंद केला. त्यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आले व त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.

‘चाचणी कक्षात मी बसलेल्या टेबलसमोरच असलेल्या दरवाजातून बिबट्या आत आला. पण कामात मग्न असल्याने माझे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. तो डाव्या बाजूने टेबलच्या एक फूट अंतरावरून गेला पण माझे दैव बलवत्तर की त्याने माझ्यावर हल्ला केला नाही. बाहेरून ‘वाघ’ असा अस्पष्ट आवाज ऐकला. त्याच क्षणी टेबलच्या बाजूला मीटर बॉक्सचा आवाज आला व तिकडे पाहिले असता बिबट्या दिसला. एक क्षण काहीच सूचले नाही. मात्र आरडाओरडा न करता क्षणार्धात दरवाजा गाठला व बिबट्याला चाचणी कक्षात बंद केले’, अशी माहिती शांता शेळके यांनी दिली.

या कामगिरीबद्दल वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा रास्तापेठ येथील कार्यालयात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील आदींची उपस्थिती होती