बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेवर कब्जा

276

दिघी, दि. ११ (पीसीबी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे अतितातडीची बनावट मोजणी केली. ती खरी असल्याचे भासवून 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारला. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जानेवारी ते 8 ऑक्टोबर या कालावधीत डुडुळगाव येथे घडला.

मारुती डेव्हलपर्स तर्फे सुरेश जयंतीलाल पटेल (रा. मोशी), दिलीप किसन पवार, राजेश किसन पवार, शिवाजी लक्ष्मण पवार, ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, तुकाराम लक्ष्मण पवार, नऊ महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी खंडू बळवंत पवार (वय 62, रा. गोळेवाडी, आंबी, ता. मावळ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डुडुळगाव येथे 44.75 गुंठे जागा आहे. त्यातील 22 गुंठे जागेवर आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे अतितातडीची बनावट मोजणी केली. ती खरी आहे असे भासवून जबरदस्तीने अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या ताबा घेतला. फिर्यादी त्या जागेत गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या जागेवर अनधिकृत बोर्ड लावून त्यावर एक कंटेनर उभा करून एक जोडपे ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.