बटेंगे तो कटेंगे घोषणा एका लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर

0
40

गांधीनगर, दि. १० : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. प्रचाराचा धुरळा उडालेला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एन्ट्री झालेली आहे. त्यांनी दिलेली बटेंगे तो कटेंगे घोषणा बरीच चर्चेत आहे. योगींच्या घोषणेला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत विरोध केलेला आहे. पण आता हीच घोषणा एका लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली होती. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचार करतानाही योगी याच घोषणेचा वापर करत आहेत. उत्तर प्रदेशात ९ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. तिथेही योगी आणि भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेचा वापर केला जात आहे. त्यानंतर आता गुजरातमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्यानं त्याच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर योगी आदित्यनाथांनी दिलेली घोषणा छापली आहे.

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील महुवा तहसीलमधील वांगर गावात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी २३ नोव्हेंबरला लग्न आहे. लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्यानं लग्न चर्चेत आहे. नवरदेवाच्या भावानं लग्नपत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे’ घोषणा छापली आहे. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अयोध्येतील राम मंदिराचा फोटो छापला आहे.

हरेश आणि आशा यांच्या लग्नाची पत्रिका योगींच्या घोषणेमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. याबद्दल भाजप कार्यकर्त्याला विचारण्यात आलं. त्यावर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश पोहोचवण्यासाठी लग्नाच्या पत्रिकेवर घोषणा छापल्याचं उत्तर कार्यकर्त्यानं दिलं. याच आमंत्रण पत्रिकेत स्वच्छता अभियान आणि स्वदेशीचा स्वीकार यांचाही उल्लेख आहे. विशेष म्हणजे लग्नाची संपूर्ण पत्रिका गुजराती भाषेत छापण्यात आलेली आहे. पण ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा मात्र हिंदीत छापण्यात आलेली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेवर राऊतांचा हल्लाबोल

झारखंडमध्ये नुकत्यात झालेल्या एका सभेत भाषण करताना योगींनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली. ‘तुमच्या ताकदीची जाणीव ठेवा. जातीपातीत विभागले जाऊ नका. जातीच्या नावाखाली काही जण तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेस, विरोधक हेच काम करतात. एक दिवस हे लोक तुम्हाला घराच्या आत घंटा आणि शंखही वाजवू देणार नाहीत. त्यामुळे एकत्र राहा. जेव्हा जेव्हा आपल्यात फूट पडली आहे, तेव्हा तेव्हा आपण निर्घृणपणे कापले गेलो आहोत. देशाचा इतिहास हेच सांगतो,’ असं योगी म्हणाले होते.