बँकेतील फिल्ड ऑफिसरने केली ग्राहकाची 13 लाखांची फसवणूक

0
401

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – जमीन खरेदीसाठी दीड लाख रुपयांची आवश्यकता असल्याने बँकेत ऑनलाईन अर्ज केला असता बँकेच्या फिल्ड ऑफिसरने ग्राहकाच्या नावावर वेगळ्या बँकेचे 13 लाख 21 हजारांचे कर्ज ग्राहकाच्या परस्पर मंजूर करून घेत ते पैसे त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यावर जमा करत फसवणूक केली. हा प्रकार 17 मे 2022 रोजी सायंकाळी खराबवाडी येथे घडला.

अमोल अशोक कोळी (वय 28, रा. धायरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या फिल्ड ऑफिसरचे नाव आहे. याप्रकरणी अमोल अशोक निखारे (वय 33, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आयडीएफसी बँक चाकण येथे जमीन खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज मंजुरीसाठी ऑनलाईन अर्ज केला. त्या बँकेत फिल्ड ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या आरोपी कोळी याने फिर्यादीला लिंक पाठवून ओटीपी टाकून कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. नियमाप्रमाणे फिर्यादीकडून कोळी याने तीन कोरे चेक घेतले.

त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या संमतीशिवाय आयडीएफसी फस्ट बँक बीजीएलचे पाच लाख 85 हजार 186 रुपये आणि इनक्रिड फायनान्सचे सात लाख 36 हजार 674 रुपये असे एकूण 13 लाख 21 हजार 833 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.

याबाबत फिर्यादी यांना समजल्या नंतर त्यांनी हे कर्ज घेण्यास नकार दिला. तसेच ही कर्जाची रक्कम बँकेत परत भरण्याची आरोपीला विनंती केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून सर्व रक्कम दिलीप बगाडे नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा करत फिर्यादीची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.