बँकेचे ग्राहक हे बँकेचे मालक आहेत : ज्ञानेश्वर लांडगे

174

पवना सहकारी बँकेच्या वर्धापनदिनी नवीन मुख्य कार्यालय इमारतीचे उद्घाटन

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – बँकेत येणारे ग्राहक हे बँकेचे मालक आहेत. बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांना आदरपूर्वक सेवा देणे हे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे प्रतिपादन सहकारी बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.पवना सहकारी बँकेची स्थापना स्व. खासदारांना साहेब मगर यांनी केली. बँकेच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी पवना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीचे औपचारिक उद्घाटन आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बँकेच्या बोधचिन्हाचे अनावरण बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, शिवाजी वाघेरे, वसंत लोंढे, गणेश पिंजण, जितेंद्र लांडगे, राजशेखर डोळस, सुनील गव्हाणे, शरद काळभोर, अमित गावडे, सचिन चिंचवडे, जयश्री गावडे, संभाजी दौंडकर, ॲड. गोरक्षनाथ काळे, ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे तसेच विठ्ठल ठाकूर, सुभाष मोरे, मनोहर पवार, सनी निम्हण व बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.

यावेळी ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, डिजिटल अद्ययावत सेवा देणारी शहरातील ही अग्रेसर बँक आहे. रक्कम पन्नास हजार रुपये पुढच्या ठेवीदारांना अपघाती विमा संरक्षण, कोअर बँकिंग, सर्व एटीएम सेंटर मध्ये चालणारे एटीएम कार्ड अशा अत्याधुनिक सुविधा बँकेद्वारे दिल्या जात आहेत. तसेच सोने तारण कर्जावर अर्धा टक्का व्याज सवलत देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे. पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे एकमेकांशी स्नेहाचे संबंध, ग्राहकांचा, ठेवीदारांचा संचालक मंडळ वरील विश्वास तसेच कर्मचारी आणि अधिकारी यांचे योगदान यामुळेच बँक २२ शाखाद्वारे सेवा देऊ शकत आहे. आगामी काळात आणखी तीन शाखा सुरू करण्याचे देखील नियोजन असल्याचे ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
यावेळी विजय फुगे, सतीश फुगे, शैलजा मोळक, अनंत खुडे, संजोग वाघेरे, उर्मिला काळभोर आदींनी शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी मनेश बोऱ्हाडे, सूत्रसंचालन जयनाथ काटे आणि आभार शामराव फुगे यांनी मानले.