“फ.मुं.ची कविता फुले, आंबेडकरांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करते!” – डॉ. पी. डी. पाटील

0
104

पिंपरी (दिनांक : १७ मे २०२४) “प्रा. फ. मुं. शिंदे यांची कविता फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करते; तसेच ओशो आणि खलील जिब्रानच्या तत्त्वज्ञानाशी ती नाते सांगते!” असे विचार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉल, पिंपरी येथे शुक्रवार, दिनांक १७ मे २०२४ रोजी व्यक्त केले. प्रा. फ. मुं. शिंदे लिखित आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशित ‘त्रिकाल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. पी. डी. पाटील बोलत होते. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विडंबनकार रामदास फुटाणे, समीक्षक प्रा. डॉ. रमेश वरखेडे, समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशिका अमृता तांदळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पी. डी. पाटील पुढे म्हणाले की, “८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर या परिसरात अनेक साहित्यिक कार्यक्रमांचे योग आले. ‘त्रिकाल’ हा काव्यसंग्रह मला अर्पण केला आहे; आणि एक रसिक म्हणून मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो. आपल्या कवितांच्या माध्यमातून फ. मुं. नी वाचकांच्या मनात आदराचे स्थान मिळविले आहे!” प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांनी, “‘त्रिकाल’ हा गंभीर कवितांचा संग्रह आहे. जणू काही २५४ तुकड्यांची ही एक सलग कविता आहे. गझल आणि वही या काव्यप्रकारांपेक्षा वेगळे असे हे द्रैष्टान्तिक काव्यसर्जन आहे!” अशी मीमांसा केली; तर प्रा. डॉ. रमेश वरखेडे यांनी काव्यसंग्रहाची विस्तृत समीक्षा करताना ‘त्रिकाल’ची व्याप्ती गाथा काव्यसंग्रहासारखी आहे, असे मत मांडले. प्रा. मिलिंद जोशी यांनी, सामाजिक भान हे फ. मुं. च्या कवितेचे वैशिष्ट्य आहे, असे गौरवोद्गार काढले; तर रामदास फुटाणे यांनी, बोलण्यात खट्याळपणा आणि अंतरंगात वेदना हे फ. मुं. चे स्वभाववैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन केले.

कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे यांनी आपल्या मनोगतातून, “ज्ञानेश्वरमाउलींपासून सर्जनाची सर्व कृतज्ञता रसिकांप्रति प्रतीत झाली आहे. रसिकाला जे सांगायचे असते तेच कवी कवितेच्या माध्यमातून लिहीत असतो!” अशा भावना व्यक्त करून,

“मनासारखे जगण्यास आता मन होत नाही
आपले सुख बघण्यास आता मन होत नाही!”

तसेच

“खोटे चालते पुढे
पाय मोडला सत्याचा…”

या कवितांसह ‘आई’ या सुप्रसिद्ध कवितेचे सादरीकरण केले.

भारत सासणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “तांबे, मर्ढेकर, ग्रेस या मांदियाळीतील फ. मुं. शिंदे हे एक महत्त्वाचे कवी आहेत. वरकरणी विनोदी आणि गमतीशीर वाटणारा हा कवी समजून घेताना विश्वकारुण्य हा भाव गृहीत धरावा लागेल. ‘त्रिकाल’मधील कविता आंतरिक गूढतेशी संलग्न आहेत; तसेच त्या काळजातून आलेल्या आहेत. कवितादेवी जेव्हा कृपा करते; तेव्हाच ‘त्रिकाल’सारखा काव्यसंग्रह निर्माण होतो!” अशी भूमिका मांडली.

अमृता तांदळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कर्मचारी आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस परिवाराने संयोजन केले. प्रा. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आशिष शिंदे यांनी आभार मानले. प्रांजली बर्वे यांनी गायन केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि पसायदानाने सांगता करण्यात आली.

  • प्रदीप गांधलीकर
    ९४२१३०८२०१
    ७४९८१८९६८२