फॅसिझमच्या विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या साथींवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध ! गृहमंत्र्याच्या तात्काळ राजिन्यामाची मागणी !!

0
82

पुणे, दि. १० (पीसीबी) – फॅसिझमच्या विरोधी लढणारे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या भ्याड हल्ल्याचा जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

जनांदोलनच्या प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे की, निर्भय बनो आंदोलनाच्या पुणे येथील नियोजित सभास्थानाकडे जाताना निखिल वागळे आणि साथींच्या गाडीवर जीवघेणा भ्याड हल्ला केला गेला. तत्पूर्वी सभास्थानीही भाजप व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याआधी नियेजित सभा उधळून लावू अशी धमकी सत्ताधारी भाजप शहराध्यक्षांनी जाहिरपणे दिली होती. त्याची वर्तमानपत्रात बातमीही आली होती. लोकशाही मार्गाने सभा घेण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना असताना अशा प्रकारच्या दडपशाहीचा अवलंब सत्ताधारी पक्ष करताना दिसत आहे. असा पूर्व घोषित हल्ला होऊ नये म्हणून प्रशासनाने संबंधितांना आधीच ताब्यात का घेतले नाही? आता तरी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची कार्यक्षमता पुणे पोलिस दाखवणार का हा सवाल आहेच. पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

या कार्यक्रमात सहयोगी असलेला जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (एनएपीएम) या शासन पुरस्कृत दडपशाहीचा तीव्र निषेध करत आहे. अशाप्रकारच्या फॅसिस्ट वृत्तीला अटकाव करण्यात असमर्थ ठरलेल्या शासनाचाही आम्ही धिक्कार करतो आहोत. या पत्रकाद्वारे हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी आम्ही करत आहोत तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा अशी मागणी करत आहोत.

फॅसिझमच्या विरोधी लढणारे निखिल वागळे आणि साथी निर्भय आहेतच!! आता वेळ आहे आपण सर्वांनी त्यांच्या सोबत असण्याची. फॅसिझमच्या विरोधातील लढाई आता जनआंदोलनांच्या स्वरुपात लढली पाहिजे , असे मत व्यक्त करण्यात आले.