फिल्ड अम्युनेशन डेपो, देहुरोड येथील सैनिकांना परिसरातील भगिनींनी बांधल्या राख्या

0
210

देहुरोड, दि. ०४ (पीसीबी) – 29 FAD म्हणजेच २९ फिल्ड अम्युनेशन डेपो, देहुरोड येथील मेजर विनितकुमार यांचेसह अन्य सैन्याधिकारी व सैनिक बंधुना राखी पौर्णिमेनिमित्त देहुरोड व पिंपरी चिंचवडमधील विविध महिलांनी राख्या बांधल्या. देहुरोड डॉक्टर्स असोसिएशन, मातृशक्ती, विश्व हिंदु परिषद- चिंचवड, ब्रिलियंट माईंड कौन्सिलिंग सेंटर, आधार महिला मंडळ, स्वामी समर्थ महिला मंडळ, इनर व्हिल कल्ब, निगडी प्राईड व पिंपरी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ-निसर्ग मित्र विभाग या संस्थांच्या सुमारे चाळीस महिलांनी सहभाग घेतला.

अतिशय सुंदर अशी सजावट केलेल्या प्रशस्त सभागृहात सैनिक बंधूंनी उपस्थित भगीनींचे स्वागत केले. पारंपरिक पध्दतीने साडी व अलंकार परिधान करुन आलेल्या या सर्व महिलांनी उत्साहपूर्ण व भारावलेल्या वातावरणात प्रत्येकाचे औक्षण करुन, मिठाई भरवून रक्षाबंधन केले. यावेळी राखी बांधताना प्रत्येकीला अभिमान वाटत होता, तर अनेक सैनिकांना आपल्या घराची, कुटुंबाची आठवण येऊन डोळे भरून आले होते. फिल्ड अम्युनेशन डेपोचे कमाडंट ऑफिसर मेजर विनितकुमार यांनी सर्व संस्थांनी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेऊन त्यामध्ये आम्हा आर्मी स्टाफला सहभागी करुन घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला व संयोजकांचे धन्यवाद मानले.

यावेळी उद्योजक डॉ. विजय चौधरी, डॉ. संदीप सांडभोर, उदयोजक अनिल मित्तल, श्रीकांत मापारी, माजी नगरसेविका शर्मिला बाबर आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रमेश बन्सल यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन भास्कर रिकामे यांनी केले.
डेपोतर्फे आयोजित केलेल्या अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.