प्राधिकरणात पीएमआरडीए उभारणार सांस्कृतिक भवन

0
30

वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांच्या मागणीला यश

पिंपरी, दि. ३ ( पीसीबी ) पिंपरी-चिंचवड : निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 25 येथे साहित्य ठेवण्यासाठी गाेडावून बांधण्यात आले हाेते. मात्र, या गाेडावूनची प्रचंड दुरावस्था झाली असून याठिकाणी सांस्कृतिक भवन उभारण्याचा 2019 मध्ये ठराव झाला आहे. मात्र, अद्याप यावर काेणताही निर्णय झाला नसल्याबाबत वृक्ष प्राधिकरणचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आता या पाठपुराव्याला यश येेताना दिसत असून सेक्टर 25 मध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे पत्र पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी वाडकर यांना नुकतेच दिले आहे. 

दरम्यान, सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे वाडकर यांनी आभार मानले आहेत.

नवनगर विकास प्राधिकरणाने निगडी-प्राधिकरण परिसर नियोजनबद्धपणे विकसित केला आहे. यामध्ये उद्यान, क्रीडांगणे, सांस्कृतिक भवन व आवश्यक कार्यालयांचा अंतर्भाव आहे. मात्र, प्राधिकरण बरखास्त करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण केले आहे. त्यात निगडी-प्राधिकरण भागाचाही समावेश आहे. तेथील मोकळ्या जागा व मिळकती पीएमआरडीएकडे सुपूर्द झाल्या आहेत. सेक्टर 25 मधील मोडकळीस गाेडावूनचा समावेश आहे. 

याबाबत सुरेश वाडकर म्हणाले, प्राधिकरणातील सेक्टर 25 मध्ये प्राधिकरण प्रशासनाने साहित्य ठेवण्यासाठी गोडावून बांधण्यात आले होते. सद्यस्थितीत गोडावून बंद व दूरावस्थेत आहे. प्राधिकरणाने हे गोडावून पाडून सांस्कृतिक भवन उभारण्याचा 2019 मध्येच ठराव केला आहे. मात्र, सात वर्षानंतरही गोडावून पाडून नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी काहीच हालचाल झाली नाही. सांस्कृतिक भवन बांधल्यानंतर प्राधिकरण भागातील सुमारे 4 लाख नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. लग्नकार्य, मुंज, वाढदिवस आदी कार्यक्रमांसाठी लांबच्या पल्ल्यावर असलेल्या कार्यालयात जावे लागणार नाही. यापूर्वी नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु अपूर्ण निधी असल्यामुळे निविदा रद्द करावी लागली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्यामुळे फेरनिविदा काढून नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे, अशी मागणी वाडकर यांनी केली हाेती. या मागणीची दखल घेत सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे पत्र पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी वाडकर यांना नुकतेच दिले आहे.