प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष

0
532

दीड वर्षात 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी

उर्वरित काम तत्काळ पूर्ण करा, माजी उपमहापौर हिराबाई घुले यांची मागणी

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील पुलाचे काम प्रशासकीय राजवटीत अतिशय संथ गतीने सुरु आहे. प्रशासनाच्या या संथ कारभाराचा बोपखलवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले मात्र प्रशासकीय राजवटीत दहा टक्के कामाला घरघर लागली. दीड वर्षात केवळ 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. रखडलेले 10 टक्के काम तत्काळ पूर्ण करावे आणि पूल बोपखेलवासीयांसाठी खुला करावा अशी आग्रही मागणी माजी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे बोपखेल गावासाठी दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) हद्दीतून जाणारा हा नागरी रस्ता अचानक 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला. तेव्हापासून बोपखेलच्या रहिवाशांना सुमारे 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यासाठी आम्ही नगरसेवकांनी, आमच्या नेत्यांनी पाठपुरावा केला. बोपखेल व खडकीस जोडणारा 1 हजार 866 मीटर लांबीचा पुल उभारण्याचे काम सुरू केले.

आम्ही सतत आढावा घेत बोपखेलवरुन खडकी येथे जोडणा-या पुलाचे काम 90 टक्के पूर्ण करून घेतले. केवळ 10 टक्के काम शिल्लक होते. प्रशासकीय राजवटीत हे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, उलटे झाले. प्रशासकीय राजवटीत या कामासाठी प्रचंड विलंब होत आहे. कामाला ब्रेक लागल्याची परिस्थिती आहे. टप्प्या-टप्प्याने आणि अतिशय मंद गतीने काम सुरू आहे. दीड वर्षात 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे बोपखेल मधील नागरिकांचा वेळ, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. प्रशासकीय राजवट सुरु झाल्यापासून या पुलाच्या कामाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांमध्ये नाराजीची भावना आहे. आयुक्तांनी स्वत: लक्ष्य घालून कामास भेट द्यावी. त्वरित काम पूर्ण करुन नागरिकांना वाहतुकीसाठी मार्ग खुला करावा. जेणेकरुन नागरिकांची वेळेची आणि पैशांची बचत होईल, अशी मागणी माजी उपमहापौर घुले यांनी निवेदनातून केली आहे.

नागरिकांना मारावा लागतोय 15 किलो मीटरचा वळसा –
2015 मध्ये दापोडीतील सीएमईने बोपखेलवासियांचा मार्ग बंद केला. याविरोधात मोठे जनआंदोलनही झाले होते. मात्र, सुरक्षेचा महत्वाचा मुद्दा असल्याने हा मार्ग सुरू न होता कायमचा बंद झाला. त्यामुळे बोपखेलवासीयांना पिंपरी, दापोडी ये-जा करण्यासाठी दिघीतून म्हणजे तब्बल 15 किलो मीटरचा वळसा मारावा लागत आहे. एवढ्या मोठ्या अंतरामुळे गेल्या आठ वर्षांपासून बोपखेलवासीय त्रस्त आहेत, याकडेही माजी उपमहापौर घुले यांनी प्रशासनाचे लक्ष्य वेधले.

नगरसेवक असताना बोपखेल पुलाचे काम वेगात सुरु होते. आम्ही सातत्याने आढावा घेत होतो. परंतु, प्रशासकीय राजवटीत पुलाच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. काम अतिशय संथपणे आहे. प्रशासकांना केवळ 10 टक्के काम पूर्ण करता आले नाही. प्रशासन बोपखेलवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. प्रशासनाने बोपखेलवासीयांच्या भावनांचा विचार करुन तत्काळ उर्वरित काम पूर्ण करावे. प्रशासनाकडून तातडीने काम सुरु केले जाईल आणि लवकरात-लवकर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी अपेक्षा आहे., असे स्थानिक माजी नगरसेविका आणि माजी उपमहापौर हिराबाई घुले
यांनी सांगितले.