प्रवाशांकडून रिक्षा चालकाला विनाकारण बेदम मारहाण

0
38

महाळुंगे, दि. ०१ (पीसीबी) : रिक्षात बसलेल्या चार प्रवाशांनी रिक्षा चालकाला विनाकारण बेदम मारहाण केली. एका प्रवाशाने रिक्षा चालकाच्या पायाला चावा घेत जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

खंडू सुरेश गायकवाड (वय 24, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सचिन टेकाळे, धीरज ढाले, वैभव चव्हाण, रामदास (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी गायकवाड यांच्या ओळखीचे आहेत. ते रविवारी रात्री साडेआठ वाजता गायकवाड यांच्या रिक्षात बसले. त्यांना घेऊन जात असताना रामदास याने गायकवाड यांचा शर्ट ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असल्याने गायकवाड हे रिक्षा थांबवून खाली उतरले. त्यानंतर आरोपी देखील खाली उतरले. धीरज याने गायकवाड यांना हाताने मारहाण केली. मारहाण का करत आहात, असा त्यांनी जाब विचारला असता वैभव याने गायकवाड यांच्या पायाला चावा घेतला. इतर आरोपींनी हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून आरोपी तिथून निघून गेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.