प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही – राहुल गांधींना देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर

0
30

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? असे ते म्हणाले होते. दरम्यान, राहुल गांधीच्या या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. मात्र, बाल हक्क न्यायालयाने यासंदर्भातील तो निर्णय घेतला. त्यावर अपील करून पोलिसांनी हे प्रकरणी पुन्हा बाल हक्क न्यायालयात आणले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या घटनेचं राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून बघणं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राहुल गांधी यांनी नीट माहिती घेतली असती, तर अशाप्रकारे त्यांनी विधान केलं नसतं, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
पुण्यातील अपघातावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती.“बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते. परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला १७ वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते”, असं राहुल गांधी म्हणाले होते.