प्रख्यात चैतन्य महाराजांचे प्रताप समोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
81

चाकण, दि. ०३ (पीसीबी) – किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाची सोशल मीडियावर तुफान हवा असते. इंदुरीकर महाराजांची किर्तन सांगण्याची पद्धत आणि त्याला असलेली सामाजिक वास्तव्याची झालर लोकांना भावते. त्यामुळे, डिजिटल इंडियात सोशल मीडियावर त्यांचा फोलोअर्स बेस मोठा आहे. त्याचप्रमाणे आपलाही फॉलोअर्स बेस निर्माण करण्याचा प्रयत्न नव्याने वारकरी संप्रदायात येऊ घातलेल्या महाराजांकडून होत असतो. त्यातीलच, एक नाव म्हणजे हभप चैतन्य महाराज वाडेकर. रिल्स, युट्युब व सोशल मीडियातून तरुणाईला प्रेरणादायी सल्ला आणि उपदेश देण्याचे काम चैतन्य महाराज वाडेकर करतात. मात्र,दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषण अशीच काही महाराजांची अवस्था झालीय. त्यामुळेच, पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराजांना एका प्रकरणात अटक केलीय.

बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरुन झालेल्या वादातून चैतन्य महाराज व त्यांच्या भावांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता महाराजांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांसमोर महाराजांनी आपण किती फेमस आहोत, आपला मोठा चाहता वर्ग आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आपला इंगा दाखवत युवा महाराजांना अटक केलीय.

कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर
चैतन्य महाराज वाडेकर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. युवा किर्तनकार हभप चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात 17 ऑक्टोबर 1994 साली झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. इंस्टाग्राम आणि युट्युबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच, चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार व प्रसार करतात. तसेच, युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे. युवा वर्गात मोटीव्हेशनल किर्तनकार आणि समाजातील तरुणाईला उपदेशाचे डोस देणारे युवा किर्तनकार म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे, रिल्स व युट्युबवर चैतन्य महाराजांचा फॉलोअर्स बेस मोठा आहे.

काय आहे प्रकरण?
चैतन्य वाडेकरांनी तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा लगतची जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारण्यात आली आहे. मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबीयांनी केला आहे. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी, अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मान्यचं होत नव्हती. यावरून न्यायालयीन लढा सुरु असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली.

मात्र, यातून ही जागा वाडेकरांच्या मालकीची आहे. हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं, अपेक्षित होतं. न्यायालयाने मोजणीची मागणी पूर्ण करताचं चैतन्य वाडेकर हरकून गेले. त्यांनी त्यांच्या तीन भावांसह इतर साथीदारांना एकत्र केलं, जेसीबी ही मागवला आणि रात्रीतचं कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला, कंपाऊंड ही तोडून टाकला. मग प्रकरण महाळूंगे पोलीस स्टेशनमध्ये गेलं.

आजवर समाजाला उपदेशाचे सल्ले देणाऱ्या महाराजांचे रिल्स पाहिलेल्या पोलिसांना ही हा पराक्रम पाहून धक्का बसला. आता चैतन्य महाराजांना महाराज म्हणावं तरी कसं? साहजिकच असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. बरं, आता आपण कायदा हातात घेतला तर चूक मान्य करावी? पण सोशल मीडियावर महाराज बनून संत बनू पाहणारे चैतन्य वाडेकर शांत बसले तर नवलंचं म्हणावं लागेल? अपेक्षेप्रमाणे त्यांनी पोलिसांना आपण किती फेमस आहोत आणि किती शहाणे आहोत, याचे उपदेशाचे डोस द्यायला सुरुवात केली.

सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं, मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली. मग स्वतःला महाराज समजणाऱ्या चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी कायद्याचे डोस पाजले. तेव्हा हवेत असणारे चैतन्य वाडेकर जमिनीवर आले. मग हळूहळू करत आपल्या चुका मान्य करू लागले. सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. पोलिसांनी त्यांच्यासह तीन भाऊ आणि इतर दोन अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या. जेसीबी ही जप्त केले आहे.