पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; एकास अटक

63

भोसरी, दि. २० (पीसीबी) – जेसीबी चालकाने दगड मारून पोलीस व्हॅनची तोडफोड केली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. जेसीबी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 19) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास भोसरी वाहतूक विभाग येथे घडली.

राम कुंडलिक शिंदे (वय 34, रा. घोडकी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या जेसीबी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास वाव्हळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास वाव्हळ हे भोसरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. सोमवारी मध्यरात्री ते रात्रपाळी कर्तव्यावर होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी राम शिंदे हा मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत पायी जात होता. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याने वाव्हळ यांनी त्याला आपण पोलीस असल्याचे सांगून मदतीसाठी विचारपूस केली. त्यावर त्याने फिर्यादींसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या पोलीस व्हॅनवर दगड मारून काच फोडून नुकसान केले. फिर्यादी यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. भोसरी पोलिसांचे बिट मार्शल आणि डायल 112 ही पथके पोलीस शिपाई रामदास वाव्हळ यांच्या मदतीला आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.