पोलिसांच्या नाकाबंदीत सापडली देशी दारू

0
62

निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी मध्ये शिरगाव पोलिसांना एका रिक्षातून बेकायदेशीरपणे दारू वाहतूक करणारी रिक्षा आढळली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास सुरेश डोळस (वय 33, कान्हेफाटा, ता. मावळ), विलास बबन गायकवाड (वय 40, रा. कासारसाई, ता. मावळ) आणि शिंदे वस्ती मारुंजी येथील प्रथम श्री वाईन्सचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामेश्वर जाधवर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 13) मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. दरम्यान पोलिसांनी मागील काही दिवसांपासून शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी लावली होती. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई ते सोमाटणे फाटा या मार्गावर नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये पोलिसांना एका रिक्षामध्ये देशी दारू आढळून आली. ही दारू प्रथम श्री वाईन्सच्या मालकाने बेकायदेशीरपणे रिक्षा चालकाला दिली. पोलिसांनी 17 हजार 500 रुपये किमतीची देशी दारू आणि 50 हजारांची रिक्षा जप्त केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.